हा दुर्मिळ कडू मध आहे जणू संजीवनी बुटी

मध आरोग्यासाठी लाभदायक असतो हे आपल्याला माहिती आहे. पण मध म्हणजे गोड असे एक समीकरण आपल्या डोक्यात असते. हजारो वर्षांपासून इटली मधील सार्डिनीया प्रांतात मिळणारा कोर्बेजेलो नावाचा एक मध मात्र चवीला कडू असतो. मात्र या मधाचे गुण पाहिले तर त्याला संजीवनी बुटी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सार्डिनीयन हनी या नावाने सुद्धा हा मध ओळखला जातो.

बीबीसीने या संदर्भात दिलेल्या एका अहवालानुसार कोर्बेजेलो मध कोर्बेजेलो नावाच्या झुडूपांना लागणाऱ्या फुलांपासून मिळतो. या फुलांमधून जमा होणारा मधुरस जमा करणे मधमाश्यांना सहज शक्य होत नाही. या मागचे कारण म्हणजे ही फुले शरद ऋतू फुलतात आणि त्यावेळी जास्त पाउस पडला तर फुलांचा आकार बेल किंवा घंटेप्रमाणे होतो. मधमाश्यांना त्यामुळे फुलात आत घुसणे कठीण होतेच पण पाउस असेल तर मधमाश्या मुळात पोळ्यातून बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे मध गोळा करण्याचे प्रमाण घटते आणि अगदी कमी प्रमाणात मध मिळतो. यामुळे त्याला दुर्लभ मानले जाते.

या मधाची चव कडू का असते याचा उलगडा अनेक दिवसांच्या संशोधनात सुद्धा होऊ शकलेला नाही. काही संशोधकांच्या मते फुलांच्या रसातील ग्लाकोसाईड आर्ब्युटीन या पदार्थामुळे मधाची चव कडू आहे. हा मध आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे. निद्रानाश, खोकला, कफ या विकारांवर या मधाचे सेवन अतिशय प्रभावी ठरते असे सांगितले जाते.