स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त

आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे. भारतासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त झाली आहे. राष्ट्रीय परिवार व हेल्थ सर्व्हे पाच च्या आकडेवारी वरून देशात प्रती १ हजार पुरुषांच्या मागे महिलांची संख्या १०२० आहे. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये हे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ९४६ महिला असे होते ते २०१५ मध्ये वाढून १ हजार पुरुषांमागे ९९१ महिला असे झाले होते.

विशेष म्हणजे देशात ग्रामीण भागात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात १ हजारामागे महिलांचे प्रमाण १०३७ वर गेले आहे तर शहरी भागात हेच प्रमाण १ हजार पुरुषांमागे ९५६ महिला असे आहे. विशेष म्हणजे महिलांनी शिक्षण, व्यवसाय यामध्येही आघाडी घेतलेली दिसून येत आहे.

गणित विज्ञान विषयात पदवी घेणाऱ्यात महिलांची टक्केवारी ४३ आहे . अमेरिकेत हीच टक्केवारी ३४, ब्रिटन मध्ये ३८, जर्मनी मध्ये २७ अशी आहे. व्यवसायाचा विचार केला तर नोंदणीकृत ५० हजार स्टार्टअप मध्ये ४५ टक्के महिला उद्योजक आहेत. महिला स्टार्टअपमुळे गेल्या पाच वर्षात पुरुषांच्या तुलनेत १० टक्के अधिक महसूल मिळविला आहे आणि ३ टक्के अधिक महिलाना रोजगार दिला आहे.

देशात ३९ टक्के कंपन्यात महिला मोठ्या पदावर काम करत आहेत आणि पुढच्या पाच वर्षात महिलांच्या व्यवसायात ९० टक्के वाढ होईल असे संकेत मिळत आहेत. सध्या १.५९ कोटी पेक्षा जास्त कंपन्यात महिला मालक असून त्यात स्टार्ट अप कंपन्यांचाही समावेश आहे.