सजला होळीचा बाजार, चीनला मागे टाकून देशी वस्तूंनी मारले मैदान
करोना संक्रमणाचा कहर थंडावला असतानाच देशात उन्हाळ्याच्या लाटा उठू लागल्या आहेत. गेली दोन वर्षे करोना मुळे होळी सणावर आलेली संक्रांत यावेळी नसल्याने देशभरात होळी दणक्यात साजरी होणार हे गृहीत धरून ठोक बाजार होळीच्या सामनाने सजू लागले आहेत. पिचकाऱ्या, रंग, मुखवटे, फुगे असा भरपूर माल दुकानातून उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यंदा चीनी मालाला मागे टाकून देशी मालाने मैदान मारल्याचे बाजाराचा फेरफटका मारताना जाणवते आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर होळी येते आहे. या वेळी बाजारात मोदी –योगी यांच्या छबीबरोबर सलमान कतरिना यांच्या छबी असलेल्या पिचाकार्याना मोठी मागणी आहे. यंदा गुलाल उडविण्यासाठी सुद्धा खास पिचकाऱ्या आल्या आहेत. यंदा बाजारात वॉटर टँक, एअर प्रेशर, पाईप पिचकाऱ्या फार्मात आहेत तर बालसेनेसाठी मासे, बंदुका, डोरेमोन, बेडूक, स्पायडरमॅन, बाहुल्या, पॉवर रेंजर, मिकी माउस या पिचकाऱ्या चर्चेत आहेत.
मोठ्या लोकांसाठी २० लिटरचा टँक असलेल्या पिचकाऱ्या विशेष आकर्षण ठरत आहेत. यंदा रंग, फुगे, पिचकाऱ्या सर्वच वस्तूंचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. पण मेड इन इंडियाची धूम जोरात असून हा माल चीनी मालाच्या किमतीतच बाजारात मिळत आहे.