राहुल चाहर होतोय चतुर्भुज

टीम इंडियाचा लेग स्पिनर राहुल चाहर ९ मार्च रोजी गोवा येथे त्यांची नियोजित वधू ईशानी बरोबर विवाहबंधनात बांधला जात आहे. या दोघांनी २०१९ मध्ये जयपूर येथे साखरपुडा केला होता. ईशानी फॅशन डिझायनर असून हे दोघे दीर्घकाळ एकमेकांना डेट करत आहेत. गोव्यात डेस्टीनेशन वेडिंग केल्यावर आग्रा येथे स्वागत समारंभ होणार आहे असेही समजते.

राहुल आत्तापर्यंत आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळला आहे मात्र आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन मध्ये त्याला पंजाब किंग्सने ५.२५ कोटी मध्ये खरेदी  केले आहे. राहुलने भारतासाठी एक वन डे आणि पाच टी २० खेळल्या आहेत. वनडे मध्ये त्यांने तीन विकेट घेतल्या आहेत तर टी २० मध्ये सात विकेट काढल्या आहेत.

टीम इंडिया मध्ये राहुल आणि दीपक हे दोघे भाऊ सामील आहेत. दीपक याचाही साखरपुडा जया भारद्वाज सोबत झाला आहे. गोव्यातील विवाहासाठी राहुलचे कुटुंबीय गोव्यात दाखल झाले असून दीपक उद्या गोव्यात पोहोचणार आहे असे समजते.