पुतीन यांच्याकडे आहे खतरनाक बाल सेना

रशिया युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस सुरु होत असताना रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. दरम्यान डेली स्टारच्या एका रिपोर्ट नुसार रशियाचे नेते ब्लादिमीर पुतीन जवळ मजबूत आघाडी सेना आहेच पण त्यापेक्षाही खतरनाक अशी बाल सेनाही तयार आहे. या बाल सैनिकांची ओळख थेट मृत्यूचे सौदागर अशी आहे. येथे वयाच्या आठव्या वर्षापासूनच मुले आणि मुली यांना समानतेने एके ४७ सारखी शस्त्रे चालविणे, मशीनगन्स, ग्रेनेडचा वापर कसा करावा याचे कडक प्रशिक्षण दिले जाते.

सुरक्षा तज्ञांच्या म्हणण्यानुसार या सैन्य दलाला यंग आर्मी असे म्हटले जाते. ८ ते १८ वयोगटाची मुले त्यात सामील आहेत. कोणत्याही घातक शस्त्रांचा वापर अतिशय प्रभावीपणे हे बाल सैनिक करू शकतात. कोणतेही काम चुटकीसरशी करायचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देशांपासून रशियाला असलेला धोका लक्षात घेऊन २०१५ पासूनच ही बालसेना तयार केली जात आहे. रशियाच्या या यंग आर्मी चे संपूर्ण नाव ‘नॅशनल मिलिटरी पॅट्रिअॅटिक सोशल मुव्हमेंट असोसिएशन’ असे आहे.

या सेनेत प्रामुख्याने शाळेतील मुलांना प्रशिक्षित केले जाते आणि या यंग आर्मी मध्ये सध्या १० लाख सैनिक आहेत असे सांगितले जाते. देशासाठी प्राणार्पण करण्यास ही सेना सदैव तयार आहे. रशियाने या मुलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते असा खुलासा केला असला तरी पाश्चात्य देश त्यावर हिटलर युथ अशी टीका सातत्याने करत आहेत. या मुलांना हत्यारे चालविण्याबरोबर हत्यारांची देखभाल, कुस्ती, पॅराजम्पिंग  आणि विविध परदेशी भाषा शिकविल्या जातात असेही समजते.