पंतप्रधान मोदी, झेलेन्स्की यांच्याशी आज फोनवरून चर्चा करणार

रशिया युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस सुरु होत असताना भारत सरकार मधील काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा करणार आहेत आणि दुपारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील मतदानाला भारताने अनुपस्थिती लावली होती. त्यावेळीच झेलेन्स्की यांनी ट्वीट करून मोदींना राजनीतिक समर्थन द्यावे असे आवाहन केले होते.

झेलेन्स्की यांनी पश्चिमी देशांना केलेल्या आवाहनात आम्ही रशियाचा आक्रमण परतवून लावू, रशियाचे एक लाख सैनिक आमच्या इमारतींना आगी लावत आहेत, तुम्ही मदत केली नाही तर रशियाला रोखणे अवघड आहे, कदाचित तुम्ही मला शेवटचे जिवंत पाहत असाल असे म्हटले होते.

हे युद्ध जागतिक महायुद्धात बदलेल अशी चिंता जगातील नेत्यांना वाटते आहे. युक्रेन माघार घेण्यास तयार नाही. युक्रेनच्या राजदूतानी रशियन हल्ल्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करताना भारत यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, भारताचे पंतप्रधान मोदी बडे नेते आहेत. त्यांनी रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांशी बोलले पाहिजे असा आग्रह धरून भारताला मदत करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देताना मोदी आज झेलेन्स्की यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.