ब्रिटन महाराणीनी वास्त्यव्यासाठी केली विंडसर कॅसलची निवड

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांच्या कायम वास्त्यव्यासाठी बर्कशायर येथील विंडसर कॅसलची निवड केली असून यापुढे महाराणी ब्रिटीश राजघराण्याच्या लंडन मधील बकिंघम पॅलेस मध्ये कायम वास्तव्यसाठी येणार नाहीत असे जाहीर केले गेले आहे.

रविवारच्या मिडिया रिपोर्ट नुसार महाराणी विंडसर कॅसल मध्येच राहून त्यांचे कार्यालयीन काम आणि राजेशाहीची अन्य कर्तव्ये पार पाडणार आहेत. २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत विलीगीकरणात राहण्यासाठी राणी या महालात आल्या त्या अजूनही तेथेच आहेत. यापूर्वी शनिवार रविवार किंवा अन्य काही खास कार्यक्रमाच्या वेळी महाराणी बकिंघम महालातून या कॅसल मध्ये येत असत. ७० वर्षे सिंहासनावर असलेल्या महारानींनी त्यांच्या ९५ वर्षाच्या आयुष्यातील बहुतेक काळ बकिंगहम पॅलेस मध्ये घालविला आहे.

१८३७ पासून बकिंगहम पॅलेस ब्रिटीश शाही घराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. महाराणी एलिझाबेथ यांना करोना संसर्ग झाला होता आणि त्या त्यातून बऱ्या झाल्या आहेत. मात्र आता जास्त प्रवास करावा लागू नये यासाठी भविष्यातील सर्व जबाबदारी त्या विंडसर कॅसल मधूनच पार पाडणार आहेत. २१ एप्रिल रोजी महाराणी ९६ वर्षांच्या होत आहेत. विंडसर कॅसल साधारण १ हजार वर्षे जुना असून वेळोवेळी थेथे नूतनीकरणाची कामे केली गेली आहेत. जगातील हा सर्वात मोठा राहता किल्ला आहे. परदेशी पाहुणे, विविध देशांचे प्रमुख यांच्या भेटी याच महालात महाराणी घेतात.