अणुयुद्ध झाले तरी ही ठिकाणे राहतील सुरक्षित
रशिया युक्रेन मध्ये सुरु असलेले युद्ध समजा जागतिक युद्धात परिवर्तीत झाले आणि त्यातून अण्वस्त्रे वापरली गेली तर काय घडेल याची चर्चा सर्व माध्यमांवरून जोरात सुरु आहे. अणुयुद्ध झाले तर पृथ्वीवरील अनेक देशांचे नामोनिशाण पुसले जाईल हे सर्व देश मान्य करत आहेत मात्र तरीही काही भागातील नागरिक यातून वाचून मजेत राहतील असेही सांगितले जात आहे. आज जगातील ८ देशांकडे १३ हजार अणुबॉम्ब आहेत असा अंदाज आहे. अनेकवेळा पृथ्वी नष्ट होऊ शकेल इतकी त्यांची क्षमता आहे. त्यातील ६८०० अण्वस्त्रे तर एकट्या रशियाकडे आहेत.
द सनच्या रिपोर्टनुसार अणुयुद्ध झालेच तर पृथ्वीवरील सर्व देश नष्ट होतील पण काही भाग मात्र त्यातून सहीसलामत राहणार आहेत. त्यातील पहिला आहे अंटार्टीका. जून १९६१ मध्ये झालेल्या करारानुसार या ठिकाणी कोणत्याही देशाने कोणत्याही प्रकारच्या सैन्य हालचाली करायला बंदी आहे. या करारात जगातील बहुतेक सर्व देश सामील आहेत.
दुसरे ठिकाण आहे अमेरिकेच्या कोलोराडो मधील पहाडी भाग. येथे एक असे सेंटर आहे जे अमेरिकेने न्युक्लीअर प्रुफ तळ म्हणून तयार केले आहे. या विवाराचे प्रवेशद्वार २५ टनी भक्कम दरवाजा असून तो कितीही उष्णतेने वितळणार नाही. येथे अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड आणि युएस नॉर्दन कमांडची मुख्यालये आहेत. १९६६ मध्ये तेव्हाच्या सोविएत संघाने अणुहल्ला केलाच तर सुरक्षेसाठी हा तळ उभारला गेला आहे.
तिसरे स्थळ आहे आईसलंड हा देश. उत्तर ध्रुव भागातील हा चिमुकला देश वर्षभर बर्फाच्छादित असतो. या देशाचे कुणाशीच शत्रुत्व नाही. त्यामुळे या देशावर कुणी अणुबॉम्ब टाकेल अशी शक्यता नाही. चौथे ठिकाण म्हणजे पॅसिफिक समुद्रातील गुआम हे बेट. या बेटावर अवघे दीड लाख लोक राहतात आणि त्यांच्या लष्करात १३०० सैनिक आहेत. त्यातील २८० फुल टाईम सैनिक आहेत. पर्यटनावर निर्भर असलेल्या या छोट्या बेटाला कुणी शत्रू नाही.
पाचवे ठिकाण आहे इस्रायल. वास्तविक बाराही महिने या ना त्या मुस्लीम देशांशी लढत असलेल्या इस्रायलची सेना अत्याधुनिक आणि अति दक्ष आहे. पण तरीही जागतिक युद्ध पेटले तरी या देशावर हल्ला होण्याची शक्यता अगदी कमी आहे याचे मुख्य कारण म्हणजे मुस्लीम, क्रिश्चन आणि ज्यू या तीन धर्माची प्राचीन स्मारके या देशात आहेत. त्यामुळे या धर्मांचे पालन करणारा कुठलाच देश इस्रायलवर अणुबॉम्ब टाकण्याची शक्यता फारच कमी आहे असे म्हटले जाते.