करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यांचे अकाली निधन झाल्यामुळे क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मस्तमौला अंदाजाने जगणारा शेन वादग्रस्त विधाने, गर्ल फ्रेंड्स, घटस्फोट यामुळे नेहमी चर्चेत राहिला असला तरी क्रिकेट मधून संन्यास घेतल्यावर सुद्धा करोडोंची कमाई करत होता.

क्रिकेट समालोचन, जाहिराती, व्यवसायात शेन शेवटपर्यंत कार्यरत होता आणि त्यांतून त्याने करोडो रुपयांची संपत्ती जमविली आहे. क्रिकेट संन्यास घेतल्यावर सुद्धा त्यांच्या ब्रांड व्हॅल्युवर परिणाम झाला नव्हता. १५ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून करियरला विश्राम दिल्यावर अनेक बड्या स्पोर्ट्स चॅनलवर त्याने क्रिकेट तज्ञ म्हणून काम केले, अनेक जाहिराती केल्या. सेलेब्रिटी नेटवर्थ वेबसाईट नुसार शेनची एकूण संपत्ती ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३८१.८६ कोटी आहे. क्रिकेट, कॉमेंट्री, जाहिराती शिवाय अन्य स्रोतातून त्याने हा पैसा कमावला आहे.

अनेक सेलेब्रिटी सामने शेन खेळला आणि सातत्याने विवादात राहिला. २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटची कसोटी खेळणाऱ्या शेनने कसोटी मध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या कसोटी करिअरची सुरवात १९९२ मध्ये भारताविरुद्ध खेळून झाली होती.