अशी आहे पुतीन यांची सुरक्षा

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांचा परिवार, त्यांचे खासगी जीवन या विषयी फारशी माहिती कधीच बाहेर आलेली नाही. आज पर्यंत जी माहिती उपलब्ध आहे त्यातील बरीचशी माहिती अंदाज म्हणून समोर आलेली आहे. पुतीन स्वतः उच्च प्रतीचे गुप्तहेर म्हणून गाजलेले आहेत. पुतीन आता राष्ट्रपती असल्याने त्यांची सुरक्षा आणखीनच कडक असणार हे उघड आहे.

उपलब्ध माहितीनुसार पुतीन यांच्या सुरक्षेत २४/७, उच्च प्रशिक्षित बॉडीगार्डस आहेत. बुलेटप्रूफ जॅकेटस , अत्याधुनिक शस्त्रे आणि कुणाचाही जीव घेण्यास नेहमी तत्पर आहेत. १९९९ मध्ये रशियाची सत्ता हस्तगत केलेले पुतीन यांनी नेहमीच अतिशय कडक निर्णय घेतले आहेत. पुतीन यांनी निर्णयाची अंमलबजावणी बेपर्वा राहून केलेली आहे. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेबाबत ते नेहमीच सतर्क असतात.

डेलीस्टार नुसार पुतीन व अन्य हायटेक अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा देण्याची जबाबदारी फेडरल प्रोटेक्टीव्ह सर्विसची आहे. या विभागात ५० हजार कर्मचारी असून कुणाचीही विनावॉरंट झडती घेणे, अटक व अन्य सरकारी संस्थाना आदेश देण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. पुतीन यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यापूर्वी एक क्रॅक टीम स्थापन केली जाते. हे गार्ड अगोदरच फोरेन्सिक स्वरुपात सर्व संभावित धोक्यांची तपासणी करतात. हॉटेल रूम्स, रस्ते मार्ग यांची कसून तपासणी केली जाते. गर्दीत सभेत बोलत असताना सुद्धा पुतीन पूर्णपणे सुरक्षित असतात.

पुतीन यांची सुरक्षा चार घेऱ्यामध्ये असते. त्यातला फक्त एकच प्रत्यक्ष दिसतो. पुतीन यांच्या भोवती असलेले सशत्र जवान प्रत्यक्षात दिसतात. पण त्या जवानांच्या घेऱ्यानंतर काही अंतरावर आणखी एक साध्या पोशाखातील रक्षकांचा वेढा असतो. कोणत्याही हल्ल्यासाठी हे रक्षक तय्यार असतात. तिसरा घेरा गर्दीच्या जवळ असतो आणि ठराविक रेषेच्या पुढे कुणालाही घुसू देत नाही. चौथा घेरा इमारतीच्या छतावर असतो. हे स्नायपर्स हत्यारे घेऊन पुतीन यांच्या आसपासच्या हालचाली न्याहाळत असतात. विशेष म्हणजे हे चारी वेढे फेल जातील असे गृहीत धरून मिलिटरी अॅटॅचमेंटने सज्ज एक कार पुतीन यांच्याजवळ असते.