इतके मोठे आहे गुटखा बहाद्दारांचे योगदान

गुटखा, पान मसाला खाणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड असू शकते पण गुटखा व तत्सम पदार्थ खाऊन वाटेल तिथे पिंका मारणे हा या लोकांना जन्मसिद्ध हक्क वाटतो. कोणत्याही शहरातील, गावातील रस्ते, भिंती, इमारतींचे जिने, सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये याची साक्ष देण्यास पुरेशी आहेत. अगदी ऐतिहासिक महत्वाची स्थळे सुद्धा या पिंकेतून सुटत नाहीत. भारतात गुटखा आणि तत्सम पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या मोजता येण्याच्या पलीकडे आहे मात्र या गुटखा बहाद्दारांचे योगदान अनेकांना माहिती नसेल.

भारत, गुटखा, तंबाखू, पान मसाले यावर अनेक रिपोर्ट आजपर्यंत आले आहेत. मात्र नुकताच आलेला एक रिपोर्ट या गुटखा बहादुरांची किमया सांगणारा आहे. या रिपोर्ट नुसार भारतात दरवर्षी कितीतरी लाख टन गुटखा फस्त होतो आणि त्यातून टाकल्या जाणाऱ्या पिचकाऱ्याचे प्रमाण कुणालाही थक्क करणारे आहे. दरवर्षी देशात १५.६४ लाख टन गुटखा थुंकला जातो. ही थुंक एकत्र केली गेली तर ऑलिम्पिकच्या जलतरण तलावाच्या आकाराचे अनेक तलाव काठोकाठ भरू शकतील. ऑलिम्पिक जलतरण तलावाची क्षमता २५ लाख लिटर पाण्याची असते.

एका ग्राफिक नुसार दरवर्षी सर्वाधिक प्रमाणात पिचकाऱ्या उत्तर प्रदेशात टाकल्या जातात. त्यातून ४६.३७ जलतरण तलाव पूर्ण भरू शकतात. त्या खालोखाल बिहार मध्ये ३१.३३, ओडीसा मध्ये २८.३७, बंगाल मध्ये २१.९४, गुजराथ मध्ये २०.९८, दिल्ली मध्ये १८ पूल दरवर्षी या पिचकार्यांनी भरू शकतील इतक्या प्रमाणात गुटखा थुंकला जातो. आता बोला! या यादीत महाराष्ट्राचा उल्लेख केला गेलेला नाही.