रॉबर्ट वाड्रा २०२४ ची लोकसभा निवडणुक लढविण्याच्या विचारात

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या असताना उत्तर प्रदेशात कॉंग्रेस त्यांचे गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी झटत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी अधिक सक्रीय आहेत. याचवेळी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवावी अशी सर्वाची इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे. मुरादाबाद किंवा उत्तर प्रदेशातील कोणत्याही शहरातून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक रिंगणात उतरावे आणि लोकसभेत खासदार म्हणून प्रवेश करावा अशी लोकांची इच्छा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मुरादाबाद हे रॉबर्ट वाड्रा यांचे जन्मगाव आहे.

रॉबर्ट वाड्रा पुढे म्हणाले कि २०२४ च्या निवडणुकीत उतरीन किंवा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. पण सध्या मी जनतेची सेवा करतो आहे. निवडणूक असो वा नसो, देशातील सर्व मंदिरे, चर्च, गुरुद्वारा मध्ये मी जातो आहे. दीर्घकाळ मेहनत करतोय. राजकारणात मी अशी एन्ट्री घेईन कि राजकारणात बदल होणारच. जेथे निवडणूक लढवेन तेथील जनतेचा विकास होणारच. प्रियांका घरी असते तेव्हा दोघात राजकरणाची चर्चा होते, गावागावातून जनता कशी त्रासलेली आहे याची चर्चा होते.

प्रियांका उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होतील का असे विचारल्यावर रॉबर्ट वाड्रा म्हणाले, राहुल आणि प्रियांका पदाचा विचार करून काम करत नाहीत. राजकारण त्यांच्या रक्तात आहे. जनतेसाठी ते मेहनत करतात. प्रियांका राष्ट्रीय नेता आहे. त्यामुळे फक्त उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहायचे कि देशाचे राजकारण करायचे याचा निर्णय तीच घेईल.