युट्यूबर्सचे भारतीय अर्थव्यवस्थेत ६८०० कोटींचे योगदान
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ने गुरुवारी दिलेल्या एका अहवालानुसार युट्यूब क्रिएटर्स म्हणजे युट्यूब वर व्हिडीओ बनविणाऱ्यानी व्हिडीओ बनवून २०२० मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ६८०० कोटींचे योगदान दिले आहे. युट्युबर्सनी ६,८३,९०० फुल टाईम नोकऱ्यांच्या बरोबरीने देशाची जीडीपी मजबूत करण्यास हातभार लावला आहे.
इंटरनेट, स्मार्टफोन काळात कमाई साठी नोकरी व्यवसायाशिवाय अनेक मार्ग उपलब्ध झाले असल्याचा हा पुरावा म्हणता येईल. डिजिटल युगात कमाईचे अनेक नवे मार्ग रुळत चालले आहेत. पूर्वी कमाईचे हे मार्ग खास मान्यता मिळालेले नव्हते. देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या ९२ टक्के छोट्या आणि मध्यम उद्योगांनी युट्यूबच्या मदतीने जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाल्याचे मान्य केले आहे. जसजशी युट्यूब जगातील प्रेक्षकांशी जुळत आहे त्यावरून मिडिया कंपन्यांची पुढची पिढी निर्माण करण्यात अधिक प्रभावी ठरत आहे हे दिसून येत आहे.
युट्यूब वरील ४०,००० पेक्षा अधिक चॅनल्सना १ लाख पेक्षा जास्त ग्राहक मिळाले आहेत. दरवर्षी त्यात ४५ टक्के वाढ होते आहे. देशात सहा आकडी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चॅनलची संख्या दरवषी ६० टक्क्यांनी वाढते आहे. गतवर्षीचे आकडे सांगतात, देशात ४४.८ कोटी जनता युट्यूबचा वापर करते आहे. ५३ कोटी जनता व्हॉटस अप, ४१ कोटी फेसबुक, २१ कोटी जनता इन्स्टाग्रामचा वापर करत आहे.