या मंदिरात जाण्यास धजावत नाहीत विवाहित पुरुष
राजस्थान हे पर्यटकांचे आवडते राज्य असून पुष्कर येथे जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर आहे. हे मंदिर जगप्रसिद्ध आहे आणि लाखोंच्या संखेने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पण या मंदिरात जाण्यास विवाहित पुरुष मात्र अजिबात धजावत नाहीत. अविवाहित पुरुष, आणि अविवाहित तसेच विवाहित स्त्रिया येथे जातात पण विवाहित पुरुष नाहीत. यामागे एक कथा आणि एक शाप कारणीभूत आहेत.
असे सांगितले जाते कि ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्याअगोदर पुष्कर येथे एक यज्ञ आयोजित केला होता. यज्ञ पूजा म्हणजे पत्नी बरोबर हवी. ब्रह्माची पत्नी सावित्री हिला काही कारणाने यज्ञाच्या ठिकाणी येण्यास उशीर झाला तेव्हा ब्रह्माने नंदिनी गायीच्या मुखातून गायत्रीला प्रकट केले, तिच्याशी विवाह केला आणि यज्ञाची सुरवात केली. सावित्री आली तेव्हा तिने तिच्या जागी दुसरी स्त्री बसलेली पाहून ब्रह्माला शाप दिला की ज्या सृष्टीची निर्मिती तुम्ही करत आहात ती तुम्हाला पूजणार नाही आणि जो विवाहित पुरुष तुमचे दर्शन घेईल त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. यामुळे या मंदिरात विवाहित पुरुष जात नाहीत.
रागावलेली सावित्री राग शांत झाल्यावर जवळच्या डोंगरावर गेली आणि तिने तिथे तपस्या केली. तिथेच ती राहिली. त्यामुळे या पहाडावर सावित्रीचे मंदिर बांधले गेले असून या मंदिरात प्रसाद म्हणून बांगड्या, कुंकू, मेंदी अशी सामग्री चढविली जाते. विवाहिता या मंदिरात पूजा करून पतीला दीर्घायुष्य मागतात. या मंदिरात जाण्यासाठी रोप वे ची सुविधा केली गेली आहे.