नवा नियम, वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र लावणे आवश्यक

वाहन मालकांसाठी एक जरुरी माहिती आहे. वाहनांसंबंधी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने त्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. गुरुवारी जारी केलेल्या या सूचनेनुसार वाहनावर वाहनाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि नोंदणी चिन्ह ठराविक पद्धतीने, सहज दिसेल अश्या प्रकारे लावणे बंधनकारक केले गेले आहे.

जड आणि मोठी प्रवासी वाहने, मध्यम जड वाहतूक वाहने आणि हलकी वाहने यांनी तंदुरुस्ती (फिटनेस) प्रमाणपत्र व रजिस्ट्रेशन नंबर विंडस्क्रीनच्या डावीकडे उजव्या कडेवर लावायचा आहे. ऑटो रिक्षा, ई रिक्षा, ई कार्ट, चार चाकी टेम्पो यांनी विंड स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला सहज दिसेल अश्या पद्धतीने हे प्रमाणपत्र लावायचे आहे तर मोटारसायकल सारख्या वाहनांनी सहज नजरेत येईल अश्या ठिकाणी ते लावायचे आहे. एरियल बोल्ड स्क्रिप्ट मध्ये निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगात ते लावावे लागणार आहे.