चालकाच्या नुसत्या इशाऱ्यावर चालणार मर्सिडीजची एस क्लास कार
लग्झरी कार निर्माते मर्सिडीज बेन्झ यांनी भारतात अल्ट्रा लग्झरी कार मेबॅक एस क्लास लाँच केली असून तिची सुरवातीची किंमत २.५ कोटी आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आणि नेत्यांची मर्सिडीजला नेहमीच पसंती असते. या कारचे इम्पोर्टेड मॉडेल ६८० ची किंमत ३.२ कोटी असून एस क्लास ५८० ची किमत २.५ कोटी आहे.
बेन्झ इंडियाचे सीईओ मार्टिन श्वॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी या वर्षात भारतात १० नवीन मॉडेल्स सादर करणार आहे. त्यातील एक ईएस इलेक्ट्रिक कार आहे. एस क्लासला शानदार स्टील डिझाईन बोनेट आणि ग्रील दिले गेले असून प्रथमदर्शनी नजरेत भरते. एस क्लास लिमोसिन ५.७ मीटर लांबीची असून १.३ कोटी मायक्रोमिरर डिजिटल हेडलँप दिले गेले आहेत. गेश्चर कंट्रोल असून कार चालकाच्या इशाऱ्यावर चालणार आहे. सनरुफ खोलणे, लाईट, सीटबेल्ट, दरवाजा बंद करणे अशी कामे चालक नुसत्या इशाऱ्यावर करू शकेल.
भारतात ही कार लेव्हल टू ऑटो ड्रायविंग सॉफ्टवेअर सह लाँच झाली आहे. या कारला सुरक्षेसाठी १३ एअरबॅग्ज दिल्या गेल्या आहेत. दोन इंजिन मॉडेल मध्ये ही कार उपलब्ध आहे. पहिल्या मॉडेल साठी ४.० लिटर व्ही ८ इंजिन दिले गेले असून दुसऱ्यात ६.० लिटर व्ही १२ इंजिन आहे. दोन्ही साठी नऊ गिअर ऑटो ट्रान्समिशन आहे.