हिमाचल मध्ये फुलले देशातील दुसरे ट्युलिप गार्डन

देशातील दुसरे ट्युलिप गार्डन हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे फुलले आहे. सीएसआरआर आयएचबीटी यांच्या सहकार्याने फुललेले हे गार्डन सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले गेले आहे. विशेष म्हणजे येथे लावलेली ट्युलिपची रोपे लाहुल स्पिती मधील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशात तयार केली गेली आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने आता अन्य ठिकाणी सुद्धा ट्युलिप बागा तयार केल्या जाणार आहेत. त्यात धर्मशाळा च्या योल गार्डनचा समावेश आहे.

आत्तापर्यंत जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये देशातील एकमेव ट्युलिप गार्डन होते. देशभरातून पर्यटक या बागेला भेट देण्यासाठी गर्दी करतात. येथील ट्युलिप परदेशात निर्यात होतात. तर भारतात नेदरलंड, हॉलंड आणि अफगाणीस्थान मधून ट्युलिप आयात होतात. आता अफगाणीस्थान मधील परिस्थिती बिघडलेली असल्याने त्याचा थेट परिणाम या आयातीवर होणार आहे. यामुळे सीएसआयअर आणि आयएचबीटी यांनी लाहोलस्पिती खोऱ्यात लदाख मधील शेतकऱ्यांना ट्युलिप लागवडीस प्रोत्साहित केले होते. ही फुले पहाडी भागात फुलतात.

नेदरलंडचे ट्युलिप हे राष्ट्रीय फुल असून ते जगप्रसिद्ध आहे. सुंदर रंग आणि आकार लाभलेल्या या फुलांच्या अनेक जाती आहेत. हिमाचल मध्ये सध्या ४० जातींची लाखो फुले उमलली आहेत. या गार्डन मध्ये सरोवर आणि कारंजे आहे. धर्मशाळा स्मार्टसिटी यादीत असून येथील ट्युलिप बागेमुळे हे ठिकाण भविष्यात फिल्म सिटी म्हणून प्रसिद्धीस येण्याची शक्यता आहे. श्रीनगर येथील ट्युलिप गार्डन मध्ये अनेक जाहिराती, चित्रपट शूट करण्यात आले आहेत. धर्मशाळा स्थळाच्या पर्यटनाला ट्युलिप गार्डन मुळे प्रोत्साहन मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होणार आहे. शिवाय ट्युलिपची निर्यात वाढणार असून आयात कमी होण्यास सुद्धा मदत मिळणार आहे.