येतोय ‘नथिंग’ चा पहिला स्मार्ट फोन

वनप्लस या प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सहसंस्थापक कार्ल पेई यांनी वन प्लस ला रामराम ठोकून सुरु केलेल्या नव्या ब्रांड ‘नथिंग’ ने आत्तापर्यंत एकमेव उत्पादन लाँच केले आहे. २०२१ मध्ये नथिंगने ईअरबड्स लाँच केले होते. आत्ता नव्या वर्षात कंपनी नवीन उत्पादने सादर करून पोर्टफोलीओचा विस्तार करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कार्ल पेई यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकौटवर, मार्च मजेदार असणार’ असे ट्वीट करून एक पारदर्शक डिव्हाईसचा फोटो शेअर केला आहे.

विशेष म्हणजे टेकतज्ञ आणि टिप्स्टर्स हा फोटो नथिंगच्या नव्या पारदर्शी स्मार्टफोनचा असल्याचे सांगत आहेत. कंपनीने या बाबत कोणताही खुलासा केलेला नाही. रिपोर्ट नुसार नथिंग कंपनी एक पॉवर बँक, स्मार्टफोन , हेडफोन सह पाच विविध उत्पादनांवर काम करत आहे. पॉवर बँक ‘नथिंग पॉवर’ नावाने तर स्मार्टफोन ‘नथिंग फोन वन’ नावाने बाजारात आणले जातील असे संकेत दिले जात आहेत.

काही दिवसापूर्वी कार्ल पेई यांनी त्याच्या ट्वीटरवर थ्रेड संकेत दिले होते आणि नवीन अँड्राईड स्मार्टफोनवर काम सुरु असल्याचे सूचित केले होते. त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेटचा उल्लेख केला गेला होता. याच महिन्यात पॉवर बँक आणि हा स्मार्टफोन सादर केले जाईल असा अंदाज आहे. एका अनाम गुंतवणूकदाराने सप्टेंबर २०२० मध्ये नथिंग नावाने सुरु झालेल्या या नव्या हार्डवेअर व्हेन्चर मध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे.