पुतीनना जिवंत वा मृत पकडा, १० लाख डॉलर्स बक्षीस- रशियन उद्योजकाची घोषणा

रशियाने युक्रेनबरोबर लढाई सुरु केल्याला आठवडा लोटला असताना एका रशियन उद्योजकाने संतापाने ‘पुतीन यांना जिवंत वा मृत पकडून देणाऱ्यास १० लाख डॉलर्स’ बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला पकडा अथवा ठार करा आणि १० लाख डॉलर्स मिळवा अशी खुली ऑफर त्याने मिलिटरी अधिकाऱ्यांना दिली आहे. अलेक्स कोन्याखिन असे या उद्योजकाचे नाव असून तो प्रथमपासून पुतीन यांचा विरोधक आहे.

अलेक्स यांनी त्यांच्या फेसबुक अकौंटवर मंगळवारी एक पोस्ट टाकली असून युद्धासाठी अपराधी असलेल्या पुतीन यांना पकडा, बक्षीस देणार असे म्हटले आहे. अलेक्स सध्या अमेरिकेत आहेत. पाश्चिमात्य देश आणि सरकारांनी पुतीन यांची आर्थिक कोंडी करून त्यांच्या युक्रेनवरील आक्रमणाला उत्तर दिले आहे. आता कोन्याखिन यांनी ही पोस्ट टाकून पुतीन यांच्यावरील राग व्यक्त केला आहे.

अलेक्स म्हणतात,’ रशियन नागरिक या नात्याने रशियाला सांप्रदायिक होण्यापासून वाचविणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे.’ त्यांनी युक्रेनच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचा म्हणजे निळा आणि पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला प्रोफाईल फोटो शेअर केला आहे. सोविएत संघाचे पतन झाल्यानंतर अलेक्स यांनी त्यांच्या करियर मध्ये उत्कर्ष केला आहे. प्रथमपासून ते पुतीन यांच्या विरोधात असून पुतीन यांनी कपटाने आणि संविधानाचे उल्लंघन करून सत्ता काबीज केल्याचे सांगत आहेत.