चंद्रावर आदळणार रॉकेट, प्रचंड मोठे विवर बनणार

शुक्रवारी चंद्रावर एक मोठी घटना घडत आहे. पृथ्वीवरून सोडले गेलेले आणि सुरवातीपासूनच अंतराळात भटकलेले एक रॉकेट चंद्रावर आदळणार आहे. रॉकेटच्या या मलब्याचे वजन ३ टन असून ताशी ९३०० किमी वेगाने हा कचरा चंद्राला टक्कर देणार आहे. यामुळे प्रचंड मोठी धूळ उडेलच पण चंद्राच्या पृष्ठभागावर ३३ ते ६६ फुट खोल खड्डा पडेल असा अंदाज वर्तविला गेला आहे.

ज्या ठिकाणी ही रॉकेट कोसळेल ती जागा पृथ्वीवरून दुर्बिणीतून सुद्धा दिसणार नाही. त्यामुळे ही टक्कर झाली का नाही याची खबर सॅटेलाईट प्रतिमेवरूनच मिळू शकेल आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल असे सांगितले जात आहे. हे रॉकेट चीनचे असून १० वर्षापूर्वी ते लाँच केले गेले होते आणि तेव्हापासूनच ते अंतराळात भरकटले होते. अगोदर हा कचरा म्हणजे एलोन मस्क यांच्या उपग्रहाचा असावा असे म्हटले जात होते. मात्र नंतर हे चीनचे रॉकेट असल्याचे समोर आले. चीनने हे रॉकेट त्यांचे असल्याचा इन्कार या अगोदरच केला आहे.

जे उपग्रह दूरवर खोल अंतराळात पाठविले जातात त्यांच्यात टक्कर होण्याची शक्यता कमी असते पण पृथ्वी कक्षेजवळ असलेले उपग्रह एकमेकांवर धडकू शकतात असे तज्ञ सांगतात. मात्र अनेक हौशी खगोल निरीक्षक अश्या भरकटलेल्या वस्तूंवर लक्ष ठेऊन असतात आणि त्यांना खगोलीय हेर म्हटले जाते. अश्याच एका बिल ग्रे नावाच्या खगोलीय हेराने हे रॉकेट चंद्रावर आदळत असल्याची माहिती समोर आणली होती. चंद्रावर अगोदरच अनेक खड्डे आहेत. त्यातील काही २५०० किमी लांबीचे आहेत. चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे उल्का अथवा क्षुद्र ग्रह चंद्राला धडकण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठविल्या गेलेल्या रॉकेट पैकी ५८ रॉकेट चंद्रावरच आदळून नष्ट झाली आहेत असेही सांगितले जाते.