काशीविश्वनाथाचे गर्भगृह सोन्याने झळाळले

महाशिवरात्रीच्या दिवशी काशी विश्वनाथ मंदिराचे गर्भगृह सोन्याने झळकलेले भाविकांना पाहायला मिळाले. गर्भगृहातील भिंती, गाभारयावर सोन्याचे पत्रे जडविले गेले असून यासाठी द. भारतातील एका उद्योजकाने ६० किलो सोने दान दिल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार या उद्योजकाने आपले नाव गुप्त ठेवले आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त हे सोने दान केल्याचे सांगितले आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडोर भव्य दिव्य स्वरुपात तयार करून त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते नुकतेच केले गेले होते. त्यानंतर आता गर्भगृह सोन्याने झळाळल्याने मंदिराला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाशिवरात्र उत्सव संपल्यावर गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतींवर सोन्याचे पत्रे लावले जाणार आहेत. पंतप्रधानांनी रविवारी मंदिरात दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला त्यावेळी  काढल्या गेलेल्या फोटोत गर्भगृहातील सोने काम दिसले आहे. १३ डिसेंबर ला काशी विश्वनाथ कॉरीडोरचे लोकार्पण केल्यावर प्रथमच मोदींनी या मंदिराला भेट दिली आहे.

मंदिराचे प्रमुख पुजारी दीपक अग्रवाल म्हणाले, ज्या व्यक्तीने हे सोने दान दिले त्यापैकी ३७ किलो सोने वापरले गेले आहे. हे काम जानेवारी मध्येच सुरु झाले होते. प्रथम प्लास्टिक, मग तांबे धातूंचे साचे त्यासाठी बनविले गेले आणि शेवटी सोन्याचे पत्रे त्यावर चढविले गेले. शुक्रवारी सोन्याचे काम सुरु झाले ते रविवारी पूर्ण केले गेले. दिल्लीच्या महालक्ष्मी आंबा ज्वेलर्सचे १० कारागीर येथे सतत काम करत होते.