एअर इंडिया सीईओ पद आयसी यांनी नाकारले

टाटा समूहाने नुकत्याच अधिग्रहण केलेल्या एअर इंडिया संदर्भात एक बातमी आहे. टाटा समूहाने या विमान कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदासाठी निवडलेले इल्कर आयसी यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसी यांचे पाकिस्तान आणि अल कायदा बरोबर संबंध असल्याचे आरोप झाल्यामुळे आयसी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतरच हे पद १ एप्रिल किंवा त्यापूर्वी आयसी स्वीकारणार होते.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार एका तुर्की साईटवर इल्कर आयसी यांनी एक मेल प्रसिद्ध केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘ज्या प्रकारे माझ्यासंदर्भात बातम्या पसरल्या त्या नुसार हे पद स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानजनक नाही.’ आयसी यांच्यावर पाकिस्तान आणि अल कायदाशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप असल्यावरून भारतीय मिडियाने प्रश्न उपस्थित केले होते. स्वदेशी जागरण मंचानेही एअर इंडियावर या निवडीवरून टीका केली होती.

दोन दशकापूर्वी तुर्कस्थानचे राष्ट्रपती एर्दीगोन इस्तंबूलचे मेयर होते तेव्हा आयसी त्यांचे सल्लागार होते. आयसी यांच्या २०१८ साली झालेल्या विवाहाला सुद्धा एर्दीगोन हजर होते. काश्मीर प्रश्नात एर्दीगोन यांनी नेहमीच पाकिस्तानचे समर्थन केले असून काश्मीरची तुलना पॅलेस्टाइनशी केली आहे. एर्दीगोन यांनी भारतावर काश्मीर मध्ये अत्याचार करत असल्याचे आरोप अनेकदा केले आहेत शिवाय तुर्कस्थान पाकिस्तानच्या बाजूने नेहमीच राहील असेही विधान केले होते.