कीव शहरातील रहस्यमयी चिन्हांचे गूढ
रशिया युक्रेनची राजधानी कीव शहरावर हल्ले चढवत असताना अनेक इमारतींवर दिसणाऱ्या काही खुणा विशेष चर्चेत आल्या आहेत. या खुणांमागचे रहस्य काय असावे यावर चर्चा होत आहे. दरम्यान कीव प्रशासनाने नागरिकांना जिथे कुठे अशी चिन्हे दिसतील ती त्वरित झाकून टाका, नष्ट करा, एकमेकांना सावध करा आणि प्रशासनाला माहिती द्या असे आवाहन केले आहे.
कीव मधील उंच इमारती, रस्त्यांवर क्रॉसची निशाणे अनेक ठिकाणी दिसू लागली आहेत. कीव मध्ये राहणाऱ्या रशियन समर्थकांनी रशियन सैन्याला शहरातील महत्वाची ठिकाणे कुठली ते समजावे आणि तेथे बॉम्ब टाकले जावेत म्हणून अश्या खुणा केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कीव प्रशासनाने अश्या खुणा करणाऱ्या गद्दारांना १५ ते २० वर्षे शिक्षा केली जाईल अशी घोषणा केली आहे. युक्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावर रशियन समर्थक आहेत. त्यांच्याकडून हे काम रशियाला मदत करण्यासाठी केले जात असावे असे मानले जात आहे.
अनेक मोठ्या इमारतीच्या छतावर असे क्रॉस रंगविले गेले आहेत, काही ठिकाणी ते रेड टेपने चिकटविले गेले आहेत किंवा लाकडी क्रॉस लावले गेले आहेत. मुख्य चौकात ट्रान्समीटर बसविले गेले असावेत असाही संशय व्यक्त केला जात आहे. काही युद्ध टँक्सवर झेड आकाराची खूण दिसत असून याचा अर्थ रशियाला समर्थन देणारे वाहन असा लावला गेला आहे. काही वाहनांवर ‘व्ही’ अक्षर ठळकपणे दिसले आहे. बेलारूस मधून रशियासाठी ही वाहने आली असा याचा अर्थ युद्ध तज्ञांनी लावला आहे. कारण बेलारूसच्या हेलीकॉप्टरवर असा व्ही असतो. बेलारूसने रशियाचे समर्थन केले आहे आणि त्यांच्या तोफा, हेलीकॉप्टर रशियाचा मदतीला येत आहेत असेही समजते.