पुतीन यांच्याकडे आहेत इतकी अण्वस्त्रे 

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनबरोबर चाललेल्या संघर्षात अणुबॉम्ब सिद्धतेचे आदेश दिल्यामुळे जगभरात दहशतीचा माहोल आहे. शीतयुद्ध काळात जगाने अणुबॉम्ब मुळे होत असलेल्या विध्वंसाचा धोका लक्षात घेऊन अणुयुद्ध केले जाऊ नये या प्रस्तावास मान्यता दिली होती. पण रशियाने आण्विक हल्ला सिद्धतेचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे या चर्चेला तोंड फुटले आहे.

खुद्द रशियाकडे ४४७७ अण्वस्त्रे आहेत. युक्रेनी सेना रशियाच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याच्या प्रयत्नांत आहे. शिवाय पाश्चिमात्य देशांनी युक्रेनसाठी एकजूट केली आहे त्यामुळे पुतीन यांनी अण्वस्त्र सज्जतेचे आदेश दिल्याचे मानले जात आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटीस्ट रिपोर्ट नुसार ४४७७ पैकी २५६५ स्ट्रॅटीजिक तर १९१२ नॉन स्ट्रॅटीजिक अण्वस्त्रे रशियाकडे असून त्यांनी वेगाने त्यांचे आधुनिकीकरण सुरु केले आहे. हे बॉम्ब जमीन, सबमरीन, विमानातून शत्रूवर डागता येतात. नॉन स्ट्रॅटीजिक अण्वस्त्रे ताबडतोब युद्धात तैनात करता येतात. अर्थात त्यामुळे कमी भागाचे नुकसान होते आणि रेडीएशन कमी होते. अशी शस्त्रे सहसा सैनिक तळ उधवस्त करण्यासाठी वापरली जातात. त्यात लँडमाईन पासून टोर्पेडो पर्यंत सर्व शस्त्रे येतात. युद्धात अजून यांचा वापर झालेला नाही.

मिसाईल मधून दीर्घ पल्ल्याची अण्वस्त्रे डागता येतात. रशियाकडे असलेला अण्वस्त्र पल्ला लक्षात घेतला तर ब्रिटनवर २० मिनिटात तर अमेरिकेवर ३० मिनिटात ही मिसाईल पोहोचू शकतात. काही अण्वस्त्रे संपूर्ण शहर बेचिराख करू शकतील अश्या क्षमतेची आहेत. अर्थात नाटो देशांकडे सुद्धा अण्वस्त्रे आहेत याची पुतीन यांना पूर्ण कल्पना आहे. अमेरिकेकडे प्रचंड संख्येने अण्वस्त्रे आहेत आणि त्यातील १०० अॅलर्ट मोड वर तैनात केली गेली आहेत. नाटो युद्धात उतरले तर अण्वस्त्रे धोका वाढेल असे सांगितले जात आहे.