मस्क यांच्या स्टारलिंकने युक्रेन मधील इंटरनेटला दिली संजीवनी

रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या हल्ल्यांमुळे हाहाकार माजला आहे. अश्या स्थितीत युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन मंत्री मायखाईलो फेदेरोव्ह यांच्या विनंतीला त्वरित प्रतीसाद देताना स्टारलिंकचे प्रमुख एलोन मस्क यांनी युक्रेनच्या इंटरनेट सेवेला संजीवनी दिली आहे. गेले चार दिवस रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील इंटरनेट ट्रान्समिशन सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मायखाईलो फेदेरोव्ह यांनी मस्क यांना ट्वीट करून युक्रेनला स्टार लिंक स्टेशन द्या अशी विनंती केली होती. त्याला १० तासात प्रतिसाद देत मस्क यांनी इंटरनेट सेवा सक्रीय झाली असल्याचे उत्तर मायखाईलो फेदेरोव्ह यांना ट्वीट करून दिले आहे.

मायखाईलो फेदेरोव्ह यांनी मस्क यांना ‘ तुम्ही मंगळावर कॉलनी वसवत आहात आणि येथे रशिया युक्रेनचा कब्जा घेत आहे. तुमची रॉकेट अंतराळात यशस्वीपणे उतरतात, येथे रशिया युक्रेनी नागरिकांवर रॉकेट हल्ले करत आहे. रशियाच्या हल्ल्याविरोधात उभे राहण्यासाठी स्टारलिंक स्टेशन द्या’ अशी विनंती केली होती. स्टार लिंक सॅटेलाईट ब्रॉडबॅंड अशी व्यवस्था आहे जी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नेटसेवा पुरवू शकते.

विशेष म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्येच युक्रेनचा शेजारी पोलंड मध्ये स्टारलिंकने परीक्षण केले आहे. त्यामुळे मस्क यांनी मायखाईलो फेदेरोव्हच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद देऊन नेटसेवा सक्रीय केल्याचे म्हटले आहे. स्टार लिंकने पृथ्वीच्या कक्षेत २ हजार उपग्रह स्थिर केले असून शुक्रवारी आणखी ५० नवे उपग्रह लाँच केले आहेत.