बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे युक्रेनमध्ये झाले आहे शुटींग

युक्रेन रशिया युध्द परिस्थितीवर सर्व जग नजर ठेऊन आहे. पण एक वेळ अशी होती की भारतीय चित्रपट निर्माते युक्रेनमध्ये शुटींग करण्यास प्राधान्य देत होते. अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शुटींग युक्रेन मधील सुंदर स्थळांवर केले गेले आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटले असून युक्रेन मध्ये बॉम्ब, रणगाडे, लष्करी वाहने, बंदुका, तोफांचे आवाज आता भरून राहिले आहेत. अश्या वेळी बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना युक्रेन मधील शुटींगचा काळ आठवणे साहजिक म्हणावे लागेल.

अनेक चित्रपट निर्मात्यांनी युक्रेनला शुटींगसाठी पहिली पसंती दाखविली होती. २०२१ मध्ये कोविड काळात सुद्धा रशिया आणि युक्रेनने पर्यटकांना त्यांच्या देशाची दारे उघडी ठेवली होती. त्यामुळे एसएस राजमौली यांनी त्यांच्या आरआरआरचे शुटींग युक्रेनमध्ये केले होते. एनटी रामाराव ज्युनिअर आणि आलीया यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट २५ मार्च २०२२ ला रिलीज होत आहे.

सलमानच्या टायगर तीन चित्रपटाच्या काही भागाचे शुटींग युक्रेन मध्ये केले गेले आहे तर अक्षयकुमार, रजनीकांत आणि एमी जॅक्सनच्या गाजलेल्या २.० ची गाणी युक्रेन मध्ये शूट केली गेली होती. तेलगु ‘विनर’ आणि ए आर रेहमान च्या ’९९ सॉंगज’ या चित्रपटांचे शुटींग सुद्धा युक्रेन मध्ये केले गेले आहे.