विनोद कांबळीला अटक आणि जामिनावर सुटका

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २७ फेब्रुवारीला त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली पण नंतर त्याला जामिनावर मुक्त केले गेले असे समजते. विनोदने त्याच्या मुंबईतील बांद्रा येथील राहत्या इमारतीच्या गेटला कारने टक्कर मारली आणि त्यावेळी तो नशेत होता. या आरोपावरून त्याला पोलिसांनी अटक केली पण नंतर त्याला जामीन दिला गेला.

यापूर्वी सुद्धा २०१५ मध्ये विनोद आणि त्याच्या पत्नीविरुद्ध त्यांच्या नोकराणीने तिला तीन दिवस घरात कोंडून ठेवले म्हणून पोलीस तक्रार केली होती तेव्हाही त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. विनोद क्रिकेट खेळत होता त्याकाळात सुद्धा त्याच्याबाबत अनेक वाद होत असत. पण विनोद हा काही तुरुंगात जावे लागलेला एकटाच क्रिकेटपटू नाही. आयपीएल २०१३ मध्ये अशीच एक मोठी घटना घडली होती.

आयपीएल २०१३ मध्ये तीन खेळाडूना स्पॉट फिक्सिंग प्रकारणात अटक केली गेली होती. राजस्तान रॉयल्सचे अजित चंडीला, अंकित चव्हाण आणि श्रीसंत यांच्यावर आरोप केले गेले होते आणि श्रीसंतला अटक झाली होती. त्यावेळी श्रीसंत नशेत होता. त्याच्यावर आजीवन बंदी घातली गेली होती, ती नंतर ७ वर्षांवर आणली गेली. आता स्थानिक क्रिकेट मध्ये श्रीसंत पुन्हा खेळत आहे. बांग्ला देशचा तेज गोलंदाज रुबेल हुसैन याच्यावर अभिनेत्री नाजनीन हिने बलात्काराचा आरोप केल्यावर त्याला अटक करून तीन दिवस तुरुंगात ठेवले गेले होते. पण २०१५ चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्याला जामिनावर सोडले गेले. त्याने संघाला विजय मिळवून दिल्यावर त्यांच्यावरील आरोप नाजनीन हिने मागे घेतले होते.