येथील शिवलिंगाचे ४० वर्षाने एकदा होते दर्शन

यंदा १ मार्च रोजी महाशिवरात्र साजरी होत आहे. शिव पार्वती विवाहाचा हा दिवस देशात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. देशभरातील शेकडो शिवमंदिरात भाविक पूजा अर्चना करतात आणि उपवास पाळतात. भारतात अनेक रहस्यमयी शिवमंदिरे आहेत ज्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. कर्नाटकच्या मंगलोर जवळ असलेले गोकर्ण महाबळेश्वर मंदिर त्यापैकी एक आहे.

या ठिकाणी शिवाचे आत्मलिंग असून दर ४० वर्षांनी एकदा त्यांचे दर्शन होते. हे मंदिर अतिप्राचीन म्हणजे सुमारे १५०० वर्षे जुने आहे आणि कर्नाटकातील सात मुक्ती स्थळांपैकी एक आहे. दक्षिण काशी अशीही या गावाची ओळख आहे. वाराणसी प्रमाणेच हे पवित्र स्थळ मानले जाते.

अशी कथा सांगतात कि येथे गाईच्या कानातून शिवाचा जन्म झाला. रावण महान शिवभक्त होता. रावणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या साम्राज्य रक्षणासाठी शिवाने त्याला आत्मलिंग दिले होते. पण गणेश आणि वरूण देवतेने रावणाला हे शिवलिंग कट करून येथेच स्थापन करायला लावले. रावणाने खूप प्रयत्न करूनही तो हे शिवलिंग उचलू शकला नाही. रामायण महाभारतात अनेक कथांमध्ये याचा उल्लेख आहे.

या मंदिरात रोज पूजा होते आणि भाविक दर्शन घेतात. पण आत्मलिंगाचे दर्शन मात्र ४० वर्षातून एकदा होते. मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम महागणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या स्थळी इतर अनेक मोठी मंदिरे सुद्धा आहेत. तसेच सेजेश्वर, गुणवतेश्वर, मुरुडेश्वर, धारेश्वर आणि महाबळेश्वर अशी पाच महाक्षेत्रे आहेत.

गंगावली आणि अधनाशिनी या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलेले असून त्याचा आकार गाईच्या कानासारखा आहे असे सांगितले जाते. मंदिरातील शिवलिंग ६ फुट लांब असून मंदिर द्रविड शैलीत बांधले गेले आहे.