हरियाणाच्या मुर्राह जातीच्या रेड्यांना अमेरिकेत प्रचंड पसंती
शुक्रवारी हरियाणाच्या भिवानी येथे राज्यस्तरीय पशु मेळ्याला सुरवात झाली असून शेरू,बादल, सूर्या या मुर्राह जातीच्या रेड्यांची क्रेझ बाजारात कायम असल्याचे दिसून आले आहे. या जातीच्या रेड्याच्या विर्याला म्हणजे सिरमला केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर अमेरिकेतून सुद्धा प्रचंड मागणी आहे. पशु मेळ्यात या वर्षी प्रचंड गर्दी असून अनेक पशु मालकांना मेळ्यात जागा मिळणे अवघड झाल्याचे दिसून आले आहे.
हरियाणात मुर्राह जातीची जनावरे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यातही अमेरिकेसारख्या विकसित देशातील पशुवैज्ञानिक या जातीच्या रेड्याना विशेष पसंती देतात. शेरू नावाच्या रेड्याच्या वीर्यापासून अमेरिकेत ६०० हून अधिक म्हशी जन्माला आल्या आहेत असे सांगितले जाते. शेरूच्या तगडेपणाचे रहस्य त्याला दिल्या जात असलेल्या सफरचंद, काजू, बदामाच्या खुराकात आहे. २०१४ मध्ये शेरुचे वीर्य २००० स्ट्रो सीआयआरबीच्या माध्यमातून अमेरिकेला पाठविले गेले होते त्यातून ६०० वासरे जन्माला आली होती.
याच शेरूचा बादल नावाचा साडेपाच वर्षाचा वंशज दर महिन्याला मालकाला १२ ते १४ लाख रुपये केवळ वीर्य विक्रीतून मिळवून देत आहे. आत्तापर्यंत अश्या विक्रीतून ७० लाखाची कमाई झाली असल्याचे त्याचे मालक देवेंद्र सांगतात. २०२०-२१ मध्ये त्याने हरियाना ब्रीड चँपियनशिप खिताब आणि दीड लाखाचे पारितोषिक जिंकले आहे. हा बादल भिवानी जत्रेत त्याचा दोन महिन्याचा वंशज सूर्या सोबत आला आहे. देवेंद्र गेली ३६ वर्षे मुर्राह ब्रीडिंगवर रिसर्च करत आहेत. त्यांच्याकडे या जातीची ६० जनावरे असून २२५ म्हशी आहेत.