पाक सेनेत प्रथमच दोन हिंदू अधिकाऱ्यांना पदोन्नती

पाकिस्तानी लष्करात तैनात असलेल्या दोन हिंदू अधिकाऱ्याना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती दिली गेली आहे. मेजर डॉ.कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती मिळाली असून पाकिस्तान सेनेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.

पाकिस्तानी स्थानिक मिडियानुसार सिंध प्रांतातील तारपारकार जिल्ह्यातील कैलाश कुमार २०१९ मध्ये हिंदू समुदायातील पहिले मेजर बनले होते. १९८१ साली जन्मलेल्या कैलाश कुमार यांनी लियाकत विद्यापीठातून एमबीबीएस केले असून २००८ मध्ये ते पाकिस्तान लष्करात कॅप्टन बनले. मेजर डॉ. अनिल कुमार २००७ मध्ये पाकिस्तानी सेनेत सामील झाले आहेत. पाकिस्तान टीव्हीने गुरुवारी ट्वीट करून या दोघांच्या बढतीबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार  लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळालेले हे पहिलेच हिंदू अधिकारी आहेत.

पाकिस्तान मध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायावर सातत्याने अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत असतात. हिंदू मंदिरांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही नेहमी येतात. इम्रान सरकार अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेचा दावा करत असले तरी तेथील कट्टरपंथीयांच्या समोर सरकारचे काही चालत नाही. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना धर्मांतर करायला लावायचे आणि त्याच्याबरोबर विवाह करायचा या घटना पाकिस्तान मध्ये सामान्य आहेत.