शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाचा छापा

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांना बुधवारी सायंकाळी ईडीने अटक केल्याच्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरावर शुक्रवारी सकाळी सकाळी आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावेळी आयकर अधिकाऱ्यांच्या सोबत सीआरपीएफ जवान सुद्धा होते. जाधव यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी आयकर अधिकारी करत असल्याचे सांगितले जात आहे. १५ कोटींच्या घोटाळा आरोपावरून ही धाड टाकली गेल्याचे समजते. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यशवंत जाधव गेली पाच वर्षे बृहनमुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) च्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.

भाजपचे आमदार अमित साटम यांनी बीएमसी मध्ये प्रचंड प्रमाणात टेंडर घोटाळा असल्याचे आणि टेंडरच्या माध्यमातून पैसा खाल्ला जात असल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाल्याचे समजते. जाधव यांच्या पत्नी यामिनी यांनी  २०१९ निवडणुकीसाठी आमदारपदाचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विषयी चुकीची माहिती दिली होती असाही आरोप आहे. विशेष म्हणजे काल मलिक यांना झालेल्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी केलेल्या धरणे आंदोलनात यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या असे समजते.