रशिया युक्रेन लढाईमुळे काही तासात अतिश्रीमंतांना ३.११ लाख कोटीचा फटका

गुरुवारी अखेर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर चढाई करून युद्ध सुरु झाल्याची घोषणा केली आणि जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत काही तासात प्रचंड घसरण झाली. युद्ध घोषणा होताच ३ ते ४ तासात जगातील टॉप १० धनकुबेरांना ३.११ लाख कोटींचा फटका बसला. त्यात सर्वाधिक मोठा फटका जगातील १ नंबरचे श्रीमंत एलोन मस्क यांना बसला असून त्यांची संपत्ती १ लाख कोटींनी कमी झाली. युद्धाची घोषणा होताच जगातील सर्व शेअर बाजार धडाम कोसळल्याने या श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे.

भारताचा विचार केला तर आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना २१८२० कोटींचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानी यांना ९७८२ कोटीचे नुकसान सोसावे लागले आहे. सत्या नडेला, किशन बियाणी, दिलीप संघवी, उदय कोटक अश्या भारतातील टॉप १० मधील उद्योजकांचेही मोठे नुकसान झाले आहे. फोर्ब्सचे रिअल टाईम डेटा नुसार श्रीमंत उद्योजकांच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणवर घसरले आहेत. या पहिल्या दहा उद्योजकांना एकूण ६० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे समजते.

जगातील बहुतेक सर्व म्हणजे अमेरिका, भारत, जपान, चीन, ब्रिटन सह अनेक देशात शेअर बाजार कोसळले आहेत. मस्क यांच्या प्रमाणे जेफ बेजोस यांना ४१३९० कोटी तर बिल गेट्स यांना १२७९३ कोटी, मार्क झुकेरबर्ग याला ९७८२ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.