रशियाकडे आहे ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’

रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यामुळे रशिया आता युक्रेन विरोधात कोणती अस्त्रे शस्त्रे वापरू शकतो या चर्चेला जोर आला आहे. रशियाकडे जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब असून त्याला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ असे म्हटले जाते. हा अतिविनाशक शक्तिशाली बॉम्ब रशिया युक्रेनविरोधात वापरू शकते असे जाणकारांचे मत आहे. हा एक बॉम्ब काही क्षणात प्रचंड मोठ्या भागाची राखरांगोळी करू शकतो. रशिया सातत्याने युक्रेनवर मिसाईल्स डागत आहे. त्याचे आवाज युक्रेन मध्ये भरून राहिले आहेत.

ब्रिटीश मिडियाच्या रिपोर्टनुसार पुतीन यांनी रशियन सेनेला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छोट्या अणुबॉम्ब इतके नुकसान हा बॉम्ब करू शकतो. अमेरिकेकडे असलेल्या ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ पेक्षा हा बॉम्ब आकाराने आणि वजनाने लहान असला तरी अमेरिकेच्या बॉम्ब पेक्षा तो अधिक विध्वंसक आहे. रशियाने हा बॉम्ब २००७ साली विकसित केला असून त्याचे वजन ७१०० किलो आहे. हा बॉम्ब टाकला तर त्यातून ४४ टन टीएनटी उर्जा निर्माण होते त्यामुळे प्रचंड मोठा परिसर क्षणात पूर्ण नष्ट होतो. ११ सप्टेंबर २००७ मध्ये या बॉम्बच्या चाचण्या झाल्या आहेत.

अमेरिकेचा ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ २००३ मध्ये तयार केला गेला असून अमेरिकेकडे असे १५ बॉम्ब आहेत. त्याचे वजन ९८०० किलो असून तो ९.१८ मीटर लांब आहे. ८५०० किलोची विस्फोटके त्यातून वाहून नेता येतात. हा बॉम्ब टाकला तर ११ टन टीएनटी उर्जा निर्माण होते. अमेरिकेने या बॉम्बची पहिली टेस्ट ११ मार्च २००३ मध्ये तर दुसरी टेस्ट २१ नोव्हेंबर २००३ मध्ये केली होती. सामान्य लढाऊ विमानातून हा बॉम्ब टाकता येत नाही. त्यासाठी सी १३० सारख्या मोठ्या विमानांचा वापर करावा लागतो.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने सर्वप्रथम या बॉम्बचा वापर  आयएसआयएस चा दहशतवादी ठिकाणावर अफगाणिस्थान मध्ये केला होता. त्यानंतर दोन दिवसानंतर अफगाण सेनेने या जागेची पाहणी केली तेव्हा आयएसआयएस चे बड्या नेत्यांसह ९४ दहशतवादी ठार झाल्याचे दिसून आले होते.