आयपीएल २६ मार्च पासून सुरु, २९ मे ला अंतिम सामना

टाटा पुरस्कृत आयपीएल २०२२ च्या तारखा आल्या असून २६ मार्च रोजी पहिला सामना होणार आहे तर अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या लंडन मध्ये असल्याने व्हर्च्युअली या बैठकीत सामील झाले होते.

या लीग मधील सर्व सामने महाराष्ट्रात खेळविले जाणार असून मुंबई आणि पुण्यात ते होणार आहेत. प्ले ऑफ सामन्यांबद्दलचा निर्णय नंतर जाहीर केला जाणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले २६ मार्च रोजी स्पर्धेतील पहिला सामना होईल. स्टेडीयम मध्ये प्रेक्षकांना मर्यादित संख्येने प्रवेश देण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे.

यंदाच्या लीग मध्ये १० संघ सहभागी होत आहेत आणि एकूण ७० सामने खेळले जाणार आहेत. पैकी ५५ सामने मुंबईत चार स्टेडीयम मध्ये होतील. त्यातील २० सामने वानखेडे स्टेडियमवर, १५ ब्रेबोनवर, २० डीआय पाटील स्टेडियमवर होतील. पुण्यातील १५ सामने महाराष्ट्र क्रिकेट असो.च्या स्टेडीयमवर खेळविले जाणार आहेत.