हा आहे जगातील सर्वात युवा बिटकॉईन करोडपती

कुणाचे नशीब कधी पालटेल सांगता येणे अवघड. एका क्षणात राजांचा रंक आणि रंकाचा राजा होण्याची किमया जगात घडताना पाहायला मिळते. शिक्षणात अगदीच सुमार असलेल्या अनेक व्यक्ती अन्य क्षेत्रात तल्लख असतात आणि त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात हे सुद्धा अनेकदा अनुभवास येते. जगात सध्या २२ वर्षाचा एक युवक असाच चर्चेत आला आहे. एरिक फिनमॅन नावाचा हा मुलगा १८ वर्षाचा असतानाच जगातील सर्वात युवा बिटकॉईन मिलीनेअर बनला आहे. एरिकला शालेय शिक्षणात अगदी गती नव्हती. त्यामुळे अनेकदा त्याचे शिक्षक तुला शिक्षण जमणार नाही, शाळा सोड आणि एखादी नोकरी बघ असे सांगत असत. शिक्षकांच्या या बोलण्याने दुखावल्या गेलेल्या एरिकने खरोखर शिक्षणाला रामराम ठोकला.

१८ वर्षाचा असताना तो पालकांना म्हणाला, मी १० लाख डॉलर्स मिळतील असे काही केले तर माला शाळा कॉलेज मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. त्यावेळी योगायोगाने त्याला त्यांच्या आजीने काही पैसे गिफ्ट म्हणून दिले होते. एरिकने ही सारी रक्कम बिटकॉईन मध्ये गुंतवली आणि आज तो जगातील सर्वात युवा बिटकॉईन करोडपती बनला आहे.

एरिकने ७१ हजार रुपये बिटकॉईन मध्ये गुंतविले होते त्यातून त्याने त्यावेळी १०० बिटकॉईन खरेदी केली होती. आज या कॉईन्सची किंमत ५० कोटी रुपयांवर गेली आहे (२७ कोटी डॉलर्स). यामुळे एरिक जगभरात चर्चेत आला आहे.