दोन हजाराच्या नोटा बाजारातून गायब

बाजारातून दोन हजार रुपये मूल्याच्या चलनी नोटा गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली असून देशात होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या काळात दोन हजाराच्या नोटांची जमाखोरी झाली असावी असे तर्क लढविले जात आहेत. लोकसभेत सरकारने यापूर्वीच दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद केली गेली असल्याचे जाहीर केले आहे. वित्तवर्ष २०२० आणि २०२१ मध्ये या मूल्यांच्या नोटांची नवी छपाई झालेली नाही असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र आज घडीला बँक एटीएम मधून दोन हजाराच्या नोटा मिळत नाहीत किंवा बँकेत सुद्धा या नोटा मिळत नाहीत असे सांगितले जात आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये एकूण १ लाख मूल्याच्या चलनी नोटांमध्ये ३२९१० मूल्याच्या दोन हजाराच्या नोटा असे प्रमाण होते. मार्च २०२१ मध्ये ते २४५१० वर आले आणि ३१ मार्च २०२१ मध्ये चलनात आलेल्या एकूण नोटांमध्ये २ हजार व ५०० रुपये मूल्याच्या नोटांचे प्रमाण ८५ टक्के होते. आता मात्र ५०० च्या नोटांची संख्या वाढली आहे. किरकोळ व्यवहार करताना दोन हजाराची नोट अडचणीची ठरते असा अनुभव आहे. त्यामुळे एटीएम, बँकेतून ५०० च्याच नोटा जास्त प्रमाणात दिल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मधून हळूहळू बँका २ हजारच्या नोटांसाठी असलेले बॉक्स काढून त्याजागी ५०० च्या नोटांसाठी बॉक्स बसवीत आहेत. एटीएम मध्ये नोटा भरणाऱ्या कंपन्यांना २ हजाराच्या नोटा दिल्या जात नाहीत कारण या नोटा कमी आहेत. शिवाय जास्त मूल्याच्या नोटा छपाई साठी खर्च जास्त येतो त्यामुळे दोन हजाराच्या नोटांची छपाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे.