पिवळी साडीवाली निवडणूक अधिकारी नव्या रुपात पुन्हा व्हायरल

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील पिवळ्या साडीत आलेल्या निवडणूक अधिकारी महिलेने सोशल मिडीयावर चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. एका रात्रीत निवडणूक कामासाठी जात असलेल्या या महिला अधिकाऱ्याचे फोटो वेगाने सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यावेळी हीच अधिकारी महिला तिच्या नव्या रूपाने पुन्हा एकदा चर्चेत आली असून लखनौच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात मोहनलाल गंज विधानसभा मतदार संघात गोसरीगंज बूथ संख्या १४४ वर निवडणूक कामासाठी हजर झाली आहे.

रीना द्विवेदी नावाची ही महिला अधिकारी यावेळी काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि पांढरी पँट, डोळ्यावर गॉगल या वेशात बंद बॉक्स मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन पोलिंग स्टाफ सह ड्युटीवर जाताना दिसली तेव्हा तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. तिचे फोटो पुन्हा सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

रीना पीडब्ल्यूडी विभागात सहाय्यक म्हणून नोकरी करतात. त्यांना एक मुलगा आहे आणि फिटनेस बाबत त्या अतिशय जागरूक असतात. त्यांच्या पतीचे म्हणजे संजय द्विवेदी यांचे  २०१३ मध्ये आजारपणात निधन झाले असून २००४ मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. संजय पीडब्ल्यूडी मध्ये अधिकारी होते. इन्स्टाग्रामवर रीना द्विवेदी यांचे २ लाख फॉलोअर्स आहेत.