करोना लसीस नकार देणाऱ्या जोकोविचने जिंकला वर्षातला पहिला सामना

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत करोना लस घेतली नसल्याने देशाबाहेर काढल्या गेलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच याने २०२२ मधला पहिला सामना जिंकून नवीन वर्षाची सुरवात केली आहे. दुबई टेनिस चँपियन स्पर्धेत जोकोविचने लारेन्जा मुरोटी याचा ६-३.६-३ असा सरळ सेट मध्ये पराभव केला आणि सामना जिंकला. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोविच त्यांचा खिताब वाचवू शकला नव्हता. कोविड लस घेतलेली नसल्याने ऑस्ट्रेलियन सरकारने त्याला देशात खेळू न देता देशाबाहेर काढले होते. या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. ऑस्ट्रेलियन ओपन खिताब राफेल नदाल याने जिंकला आहे.

करोना लस घेतली नसल्याने जोकोविचला ऑस्ट्रेलियानंतर फ्रांस ओपन मध्ये खेळण्याची परवानगी फ्रांस सरकारनेही नाकारली होती. मात्र युएई ने जोकोविच ला परवानगी दिली आणि तेथे जोकोविचने दुबई टेनिस चँपियन स्पर्धेत सहभागी होत आपला पहिला सामना जिंकला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपन मध्ये मुरोटीने दोन सेट जिंकून आघाडी घेतली होती पण कालच्या सामन्यात मुरोटी फार चांगला खेळ करू शकला नाही. जोकोविच ने गेले दोन अडीच महिने खेळू शकलो नसतानाही त्याचा खेळ चांगला झाला याबद्दल समाधान व्यक्त केले. जोकोविचचा पुढचा सामना करेन खाच्नोव आणि अलेक्स दिमिनॉर यांच्यातील विजेत्याबरोबर होणार आहे.