भारतात अशी आहे विविध श्रेणीची सुरक्षा

आम आदमी पक्षातून बाहेर पडलेल्या कुमार विश्वास यांना नुकतीच वाय श्रेणीची सुरक्षा केंद्र सरकारने पुरविल्याची बातमी आपण वाचली. देशात अनेक महत्वाच्या व्यक्तींना विविध श्रेणीची सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, उद्योजक, सेलेब्रिटी, कलाकार अश्या अनेक नागरिकांना सुरक्षा दिली जाते तशी सुरक्षा आवश्यकतेनुसार सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मिळू शकते. केंद्रीय गृहमंत्रालय त्यासाठी संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती घेऊन कुणाच्या जीवाला खरोखर धोका आहे याची खातरजमा करून धोका किती त्यानुसार सुरक्षा पुरवत असते. भारतात पाच श्रेणी त्यासाठी निश्चित केल्या गेल्या आहेत.

एसपीजी, झेड प्लस, झेड, वायप्लस, वाय आणि एक्स अश्या या श्रेणी आहेत. यातील एसपीजी सुरक्षा देशात सध्या फक्त पंतप्रधान मोदींना दिली गेली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर १९८५ मध्ये ही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप व्यवस्था अस्तित्वात आली. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे कुटुंबीय यांच्या साठी अश्या प्रकारची सुरक्षा दिली जाते.

झेड प्लस ही खास सुरक्षा पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, खासदार, नोकरशहा, माजी नोकरदार, जज, उद्योजक, खेळाडू, फिल्म कलाकार, साधूसंत अशी कोणालाही मिळू शकते. मात्र त्यासाठी गुप्तचर यंत्रणेकडून संबंधित व्यक्तीची सर्व माहिती घेतली जाते आणि त्यानुसार केंद्रीय गृहखाते या श्रेणीच्या सुरक्षेची आवश्यकता आहे का याची पडताळणी करून मग त्याला मंजुरी दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेत ३६ रक्षक असतात त्यातील १० एसपीजी तर १० आयटीबीपी कमांडो असतात. शिवाय पोलीस आणि सीआरपीएफ जवान असतात. यात एस्कॉर्ट वाहन आणि पायलट वाहन समाविष्ट असतात.

झेड सुरक्षेत २२ रक्षक असतात त्यात पाच एसपीजी कमांडो चोवीस तास संरक्षण देतात. आयटीबीपी, सीआरपीएफ अधिकारी यात येतात आणि पायलट वाहन व एस्कॉर्ट दिला जातो. वाय श्रेणीमध्ये दोन प्रकार असून वायप्लस मध्ये ११ रक्षक, दोन कमांडो असतात तर वाय मध्ये ४ ते ८ रक्षक आणि १ किंवा दोन कमांडो असतात. एक्स श्रेणीमध्ये दोन रक्षक, एक व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी येतो. यात कमांडो नसतात. स्थानिक पोलीस या सुरक्षेत काम करू शकतात.