पंतप्रधान जन्मदाखल्यासाठी तीन महिने हेलपाटे

पंतप्रधानाच्या जन्मदाखल्यासाठी वडिलांना तीन महिने आरोग्य विभागात हेलपाटे घालावे लागल्याची मजेशीर घटना घडली आहे. अर्थात ही घटना दिल्लीतील पंतप्रधानांशी संबंधित नाही तर महाराष्ट्रातील पंतप्रधान शी संबंधित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात चिंचोली गावात राहणाऱ्या दत्तात्रय चौधरी यांना या बाबत तीन महिने सतत हेलपाटे मारावे लागले आहेत.

घटना अशी कि दत्तात्रय हे एक शेतकरी असून तीन महिन्यापूर्वी त्यांच्या घरी जन्माला आलेल्या बाळाचे नाव त्यांनी पंतप्रधान असे ठेवले आहे. हा त्यांचा दुसरा मुलगा असून पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. जेव्हा दत्तात्रय बाळाचा म्हणजे पंतप्रधानचा जन्मदाखला आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांना संबंधित विभागाने मुलाचे नाव पंतप्रधान ठेवता येणार नाही कारण हे एक संविधानिक पद आहे असे सांगितले. पण दत्तात्रय यांनी त्यांचा हक्क सोडला नाही आणि हेच नाव ठेवणार आणि त्या नावाचा जन्मदाखला द्या असा हट्ट धरला. त्यासाठी त्यांना तीन महिने हेलपाटे मारावे लागले.

दत्तात्रय यांचे बालपण हलाखीत गेले आहे. कधी दुष्काळ, कधी पूर यामुळे पिके नष्ट होत. दोन वेळची भाकरी सुद्धा नशिबात नव्हती. पण त्यांनी त्यांचे स्वप्न जिवंत ठेवले. शिक्षण घेतले. आता आपल्या मुलांनी सुद्धा मोठे व्हावे आणि एक दिवस राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर आरूढ व्यावी अशी त्यांची इच्छा आहे. मुलांना नेहमी प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी त्यांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवली आहेत असे समजते.