देशात ९ करोना लसींना मान्यता, सध्या चार वापरात
देशात करोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हा महत्वाचा भाग राहिला आहे. भारतात सध्या करोना प्रतिबंधक ९ लसींना सरकारने मान्यता दिली आहे पण त्यातील चार लसीच प्रामुख्याने वापरात आहेत. कोणत्या आहेत या नऊ लसी यांची माहिती आमच्या वाचकांसाठी
करोना मुळे देशात एकूण मृत्यू झालेला आकडा पाच लाखांच्या घरात गेला आहे मात्र तिसऱ्या लाटेनंतर आता करोनाची तीव्रता कमी झाल्याचा दावा केंद्र सरकाने केला आहे. मात्र लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. भारतात पहिली लस आली ती पुण्याच्या सिरम इन्स्टीटयूटची कोविशिल्ड. आत्तापर्यंत देशात झालेल्या एकूण लसीकरणापैकी ७५ टक्के लोकांना ही लस दिली गेली आहे. दुसरी लस स्वदेशी लस असून भारत बायोटेकने ती तयार केली आहे. कोवॅक्सीन नावाने आलेली ही लस अनेक नागरीकानी घेतली आहे. या दोन्ही लसी दोन डोस आहेत.
तिसरी लस आहे स्पुतनिक व्ही. यात पहिला आणि दुसरा डोस वेगळा आहे आणि रशियाच्या या लसीचा सीमित वापर केला गेला आहे. झायडस कॅडिलाची झायकोव्ह ही तीन डोसची लस नीडलफ्री असून ती इंजेक्टरने सरळ शरीरात सोडली जाते. १२ ते १८ वायोगटावर या लसीच्या चाचण्या झाल्या आहेत पण सध्यातरी १८ वर्षावरच्या लोकाना वापरण्यासाठी या लसीला मंजुरी दिली गेली आहे. बिहार आणि अन्य राज्यात तिचा पुरवठा सुरु झाला आहे.
या शिवाय मॉडर्ना ही अमेरिकन कंपनीची एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित लस, जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल शॉट लस यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली गेली आहे. पण त्यांचा पुरवठा अजून सुरु झालेला नाही. आरबीडी प्रोटीन सब युनिट कार्बोवॅक्स ही स्वदेशी लस दोन डोस लस आहे पण अजून तिचा वापर झालेला नाही. कोवोवॅक्स ही सिरमची दोन डोस लस असून तिच्या चाचण्या झाल्या आहेत पण अजून ती उपलब्ध झालेली नाही. शेवटची नववी लस आहे डॉ. रेड्डीज मध्ये बनत असलेली स्पुतनिक लाईट. ही सुद्धा सिंगल डोस लस असून तिला ६ फेब्रुवारी रोजी सरकारने मंजुरी दिली आहे.