देशात फक्त येथेच साजरे होते शिव नवरात्र
नवरात्र म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर देवीचे नवरात्र येते. पण देवांचा देव महादेव यांचेही नवरात्र साजरे केले जाते याची अनेकांना माहिती नाही. अर्थात शिव नवरात्र देशात फक्त एकाच ठिकाणी म्हणजे उज्जैन येथे महांकालेश्वर मंदिरात केले जाते. महाशिवरात्रीच्या अगोदर नऊ दिवस या उत्सवाची सुरवात होते.
यंदा १ मार्च रोजी महाशिवरात्र असून उज्जैन येथे महांकाळेश्वर मंदिरात २१ फेब्रुवारी पासून शिव नवरात्रीला सुरवात झाली आहे. देवी प्रमाणेच या काळात शिवाला नऊ दिवस विविध रुपात सजविले जाते. या काळात गर्भगृहात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जात नाही. फक्त पुजारीच येथे प्रवेश करू शकतात.
या नऊ दिवसात १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या महांकाळेश्वर मंदिरात पहिल्या दिवशी शिवाला भांग, सुका मेवा, फळे फुले आणि रेशमी वस्त्रे नेसविली जातात. याल शृंगार स्वरूप म्हटले जाते. दुसरे दिवशी शेष नाग, तिसऱ्या दिवशी घटाटोप, चौथ्या दिवशी छबिना, पाचवा दिवस होळकर शृंगार, सहावा दिवस मनमहेश, सातवा दिवस उमा महेश, आठवा दिवस शिवतांडव शृंगार केला जातो, नववा दिवस संपूर्ण गर्भगृह पुष्पबंगला म्हणून सजवून शिवाचा विवाहोत्सव साजरा केला जातो. शिवाला हळद, चंदनाचा लेप लावून वर बनविले जाते आणि त्याचा पार्वती बरोबर विवाह लावला जातो. विवाहाचे सर्व विधी यावेळी केले जातात.