युक्रेनच्या युवकांची हिरो ‘शुटर दादी’

कोणतीही नवी गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते आणि जगात अशी अनेक उदाहरणे पहायलाही मिळतात. तसेच खऱ्या देशभक्तांना सुद्धा देशासाठी कोणत्याही वयात नवीन कामगिरी हाती घेण्यास वय अडथळा आणू शकत नाही याचे एक उत्तम उदाहरण युक्रेन मधील ७९ वर्षीय आजीबाईने घालून दिले आहे. सध्या या आजीचे फोटो सोशल मिडीयावर खूप वेगाने व्हायरल झाले आहेत. रशिया युक्रेनला वेढून बसला आहे आणि कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडणार आहे. अश्या वेळी वेलेन्त्या कोंसतात्नोवोस्का नावाची ८० च्या उंबऱ्यात पोहोचलेली आजी चक्क एके ४७ चालविण्याचे प्रशिक्षण घेते आहे. रायफल शुटींग रेंज मध्ये सुरु असलेल्या सिव्हिलियन कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर मधील हे फोटो आहेत.

स्पेशल फोर्स आजोव कडून युक्रेनच्या नागरीकांना युद्धाचे प्रशिक्षण दिले जात आहे. देशावर येत असलेल्या युद्ध संकटात नागरिकांना स्वतःचे आणि आपल्या घरांचे रक्षण करण्यासाठी शत्रूशी मुकाबला करावा यासाठी असे प्रशिक्षण दिले जात असून त्यात तरुणांपासून म्हातारे नागरिक सुद्धा सामील झाले आहेत.

७९ वर्षीय आजी सांगते, ‘मी तयार आहे. एके ४७ कशी चालवायची याचे शिक्षण घेतले आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करू शकते. माझ्या वजनाच्या मानाने आणि शक्तीच्या मानाने एके ४७ जड आहे पण तरीही देशासाठी मी तिचा वापर करणार आहे. या आजीबाईच्या साहसाने युक्रेन मधील तरुणांना प्रेरणा मिळत आहे आणि आजी आमची हिरो आहे असे हे तरुण अभिमानाने सांगत आहेत.