म्हणून रशियात कोविड टेस्ट करत नाहीत विदेशी नेते

रशिया भेटीवर जाणारे विदेशी नेते मास्को मध्ये कोविड चाचणी करून घेण्यास अजिबात राजी होत नाहीत अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामागचे कारण फारच वेगळे आहे. रशिया भेटीवर आलेल्या फ्रांस राष्ट्रपती इम्युनेल मॅक्रा आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या बैठकीच्या वेळी काढला गेलेला एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला होता. त्यात हे दोघे नेते एका लांबच लांब टेबलावर दोन्ही टोकांना बसले असल्याचे दिसत होते. तसेच जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज्स यांनीही रशिया भेटीवर आल्यावर करोना चाचणी करून घेण्यास नकार दिला होता.

विदेशी नेते कोणत्याही प्रकारची कोविड चाचणी रशियात करण्यास तयार नाहीत यामागे असे कारण आहे की यातून संबंधित व्यक्तीचे डीएनए रशियाचा हाती मिळेल. डीएनए हा असा जनुक समूह आहे, जो संबंधित व्यक्तीची सारी रहस्ये उघड करू शकतो. जगात सर्वच देश त्यांची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. देशाच्या नेत्याचे डीएनए कोणत्याही स्वरुपात शत्रू देशाच्या किंवा दुसऱ्या देशाच्या हाती लागणे नुकसानीचे ठरू शकते. आपल्या नेत्याचे डीएनए दुसर्या देशाच्या हाती लागू देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे समजले जाते.

डीएनए हा सर्व जिवंत प्राणीमात्रांचा एक जेनेटिक कोड आहे. एक थेंब रक्तातून सुद्धा यामुळे माणसाची किंवा प्राण्याची सर्व माहिती मिळविता येते. त्याचा परिवाराचा इतिहास शोधता येतो. संबंधित व्यक्तीची गुप्त माहिती, त्यांचे गुण अवगुण, त्याला असलेले विकार, आजार सर्व यावरुन शोधता येतात. जर्मनी आणि फ्रांस ही नाटो सदस्य राष्ट्रे आहेत आणि पुतीन यांनी नाटो देशांवर रशियाला कमजोर करण्यासाठी युक्रेनचा वापर केला जात असल्याचे आरोप केले आहेत. अश्या वेळी या राष्ट्रनेत्यांचे डीएनए रशियासाठी महत्वाचे हत्यार बनू शकते. डीएनए वरून त्या माणसाचा क्लोन बनविता येतो आणि त्याला कोणत्या आजारांचा धोका आहे, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी समजते.