एअर इंडियाच्या नव्या सीईओ संदर्भात गृह मंत्रालयाकडून होणार सखोल चौकशी

केंद्रीय गृहमंत्रालय एअर इंडियाच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवडल्या गेलेल्या तुर्कस्तानच्या इल्कर आयसी यांच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सरकारकडून एअर इंडियाचे अधिग्रहण केलेल्या टाटा समूह्ने तुर्की नागरिक इल्कर आयसी यांची सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. नियमानुसार जेव्हा जेव्हा भारतीय कंपनीच्या महत्वाच्या पदावर विदेशी नागरिकांची नियुक्ती केली जाते तेव्हा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्या व्यक्तीची सखोल चौकशी होते. हाच नियम आयसी यानाही लागू आहे.

टाटा समूहाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला या संदर्भात अधिकृत सूचना दिली गेलेली नाही. पण तशी सूचना मिळताच सुरक्षा मंजुरी प्रक्रिया सुरु होणार आहे. तुर्की नागरिक आयसी यांची पार्श्वभूमी तपासून पाहण्यासाठी सरकार रॉ ची मदत घेऊ शकते. तुर्कस्थानचे सध्याचे राष्ट्रपती रज्जब अय्यब उर्दगान १९९४-१९९८ या काळात इस्तंबूलचे महापौर असताना आयसी यांनी त्यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. उर्दगान भारत विरोधी वक्तव्याने सतत चर्चेत असतात. आयसी यांनी २०१५ ते २०२२ या काळात तुर्किश एअर लाईनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.