अंबानी परिवारात पार पडला आणखी एक विवाह
रिलायंस उद्योगसमूहाची स्थापना करणारे धीरूभाई अंबानी यांच्या परिवारात रविवारी आणखी एक लग्नसोहळा पार पडला आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल यांचा मुलगा जय अनमोल यांचा विवाह बालमैत्रीण कृषा शहा हिच्यासोबत मोठ्या दिमाखात रविवारी पार पडला. या विवाहाला बॉलीवूड मधील अनेक कलाकार, उद्योजक हजर होते. बिग बी यांचे सर्व कुटुंब या समारंभाला उपस्थित होते.
अनिल अंबानी यांच्या पत्नी आणि माजी बॉलीवूड अभिनेत्री टीना अंबानी यांनी एक पोस्ट या संदर्भात शेअर करून काही फोटो शेअर केले आहेत. विवाह समारंभाची बातमी समजताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अनमोल आणि कृषा यांच्या साखरपुड्याचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांचा साखरपुडा अनमोल यांच्या जन्मदिवशी म्हणजे १२ डिसेंबर २०२१ रोजी झाला होता. अनमोल यांचा जन्म १२ डिसेंबर १९९१ चा आहे. १८ फेब्रुवारी रोजी मेहंदी समारंभ झाला होता.
जय अनमोल यांनी वारविक बिझिनेस स्कुल मधून पदवी घेतली असून वडील अनिल यांचा व्यवसाय ते बघतात. कृषा आणि अनमोल यांची ओळख दीर्घकाळ आहे. कृषा सोशल वर्कर असून सध्या हॅशटॅग लवनॉटफीअर हा मेंटल हेल्थ अवेअरनेस कार्यक्रम चालविते. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून पदवी घेतली आहे.
अनिल आणि टीना अंबानी या जोडप्याला दोन मुले असून दुसऱ्या मुलाचे नाव जय अंशुल असे आहे. अनमोलच्या विवाहाला मुकेश अंबानी यांचा सर्व परिवार उपस्थित होता.