गरजू मुलांसाठी जुन्या बुटापासून चप्पल बनवून मोफत वाटणारे युवा उद्योजक


मुंबईतील श्रेयांश भंडारी आणि रमेश भंडारी या युवा उद्योजकांची ओळख एका वेगळ्या कारणाने करून घेणे महत्वाचे ठरते. गेल्या पाच वर्षापासून हे दोघे स्टार्टअप ग्रीन सोलच्या माध्यमातून जुन्या खराब झालेल्या स्पोर्ट शूज पासून टिकवू आणि आरामदायी चपला बनवून खेडोपाडी राहणाऱ्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटत आहेत. १३ राज्यातील ३ हजार गावातील ३ लाख गरजू मुलांना अश्या चपला त्यांनी पुरविल्या असून येत्या दोन वर्षात १० लाख गरजू मुलांना त्याचा लाभ देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.


२५ वर्षीय श्रेयांश सांगतो आम्ही रोज सरासरी ५०० चपला मोफत देत आहोत. या प्रोजेक्टसाठी टाटा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी सारख्या ५५ कंपन्या आर्थिक मदत करत आहेत. रतन टाटा, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पत्रे लिहून त्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे. फोर्ब्सच्या ३० वर्षाखालील अंत्रेप्रेन्यूअर् यादीत या दोघांचे नाव झळकले आहे. श्रेयांश सांगतो तो शाळेत असल्यापासून धावपटू आहे. वर्षात त्याला तीन ते चार स्पोर्ट शूज लागत असत. हे शूज खराब झाले की फेकून दिले जातात आणि घराघरातून हे शूज फेकण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांनी या शूज पासून टिकाऊ चपला बनविण्याचा निर्णय घेतला. आयआयटीच्या इनोव्हेटीव्ह आयडिया स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळाले आणि तोच पैसा त्यांनी या उद्योगात वापरला.


आता देशाच्या विविध राज्यातून त्यांना दरमहा १२०० बूट जोड्या मिळतात त्यापासून चप्पल तयार करून गरजू मुलांना वाटल्या जातात. आत्तापर्यंत १२ राज्यातील मुलांना त्यांचे वाटप केले गेले असून आता काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंड राज्यातील गरजू मुलांना त्या पुरविल्या जाणार आहेत. या चपला दोन तीन वर्षे चांगल्या टिकतात. देशभरात अश्या चपला तयार करण्याची सेंटर्स उघडली जाणार असून त्यामुळे १ हजार लोकांना रोजगार मिळेल असेही श्रेयांश यांनी सांगितले.

Leave a Comment