कांदा किमती नियंत्रणात राहण्यासाठी केंद्राचे पाऊल

गेल्या महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असलेल्या कांद्याच्या किमती वाढत चालल्याचे लक्षात घेऊन केंद्राने कांदा किमती नियंत्रणात राहाव्या यासाठी वेळेवर पाऊले टाकली असून बफर स्टॉकचा पुरवठा सुरु केला आहे. गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात कांद्याचे दर वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात कांदा ४० रुपयांवर गेला आहे दर दिल्ली आणि चेन्नई येथे ३९ रुपये व कोलकाता येथे कांदा दर ४३ रुपयांवर गेला आहे.

केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाने शुक्रवारी कांदा दरवाढ होत असलेल्या राज्यात बफर स्टॉक पुरविला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात लासलगाव, पिंपळगाव ठोक बाजाराशिवाय अन्य विविध ठिकाणी २१ रुपये किलोने कांदा पुरवठा बफर स्टॉक मधून केला जात आहे. खरीप कांद्याची बाजारातील आवक स्थिर आहे आणि ती मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. तोपर्यंत रब्बी कांदा बाजारात येऊ शकेल. दरम्यान केंद्राकडून कांदा पुरवठा होत असल्याने कांदा भाववाढ होणार नाही असे सांगितले जात आहे.