छ.शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा पुतळा औरंगाबाद येथे

छ. शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात मोठ्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद येथे केले गेले. शहराच्या क्रांती चौकात हा भव्य पुतळा बसविला गेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभाग घेतला तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद येथे उपस्थित होते. प्रथम या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी रात्री १० वा. होणार होते मात्र नंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन १० ते १२ अशी वेळ ठरविली गेली असे सांगितले जात आहे. यावेळी सर्व परिसर विद्युत रोषणाईने झगमगून गेला होता आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी राजांचा हा पुतळा २१ फुट उंचीचा असून तो ३१ फुट उंचीच्या चौथर्यावर बसविला गेला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची ५२ फुट झाली आहे. पुतळ्याचे वजन ७ मेट्रिक टन आहे आणि तो ब्रांझ धातू मध्ये बनविला गेला आहे. पुण्याचे शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. मूर्तीसाठी ९८ लाख तर चबुतरा आणि सजावटी साठी २५५ लाख रुपये खर्च झाले असल्याचे समजते. चबुतऱ्याच्या पायाशी २४ कमानी असून त्यात २४ मावळ्यांचे पुतळे आहेत. एक कारंजे असून हत्तीच्या सोंडेतून पाण्याचा फवारा उडतो.

गेली तीन वर्षे या स्मारकाचे काम रेंगाळले होते आणि त्यात अनेक वाद निर्माण झाले होते. अखेर या सर्वांवर मात करून पुतळा शिव जयंतीच्या आधी लोकार्पित केला गेला आहे.