मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो

जगातील अग्रणी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या विवो ने मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर कंपनीने ७५०० कोटींच्या प्रास्ताविक प्रकल्प गुंतवणुकीची योजना आखली असून उत्पादन युनिट विस्तारासाठी २०२३ पर्यंत ३५०० कोटींची गुंतवणूक भारतात केली जात असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी लवकरच चार्जर आणि डिस्प्ले उत्पादन स्थानिक पातळीवर सुरु करत आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादन क्षमता २०२२ च्या शेवटी ६० दशलक्षवर जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

विवोने भारतात आज घडीला १.४ लाख भारतीयांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. कंपनीचे देशभर १ हजार पेक्षा जास्त वितरक असून त्यात ९८ टक्के भारतीय आहेत. विवो इंडिया प्रमुख पैगाम दानिश यांनी सांगितले, कंपनी सध्या जी ३५०० कोटींची गुंतवणूक करत आहे, तो एकूण ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचा पहिला भाग आहे. २०२१ पर्यंत कंपनीने भारतात १९०० कोटींची गुंतवणूक केली आहे. २०१४ मध्ये कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश केला असून रिपोर्ट नुसार विवोने मेनलाईन रिटेल बाजारात मजबूत पकड मिळविली आहे. कंपनीचा भारतीय बाजारातील हिस्सा २५ टक्के आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशात विवोचे १० कोटी हून अधिक ग्राहक आहेत. ग्रेटर नॉयडा मध्ये विवोचा उत्पादन प्रकल्प आहे.